नाशिक : व्यावसायिकाचे अपहरण करून खून; मालेगाव जवळ सापडला मृतदेह
नाशिक (प्रतिनिधी): वीस वर्षीय तरुणाच्या खुनातून नाशिक सावरत नाही तोच एका व्यावसायिकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिक रोड परिसरात फर्निचर बनविणाऱ्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याने नाशिक शहरातील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सिन्नर फाट्या जवळील एकलहरे रोड वरील शाळेचे बेंच बनविणा-या कारखान्याचे संचालकाचे अपहरण झाले होते. मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात त्यांचा मृतदेह मिळून आला.
त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सिन्नर फाट्या जवळील स्वस्तिक फर्निचर, या कारखान्याचे मालक शिरिष गुलाबराव सोनवणे (५६) रा. फ्लॅट नं ए-१०३, किंग्स कोर्ट, के.जे.मेहता हायस्कुल जवळ पासपोर्ट ऑफिस शेजारी नाशिकरोड, हे शुक्रवारी (दि.९) दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलावण्यासाठी सांगितले.
मात्र, फिरोज याने आपणच कारखान्यात चला असा आग्रह धरला असता, गाडीतील व्यक्ती अपंग असून चालता येत नाही असे सांगत मालक सोनवणे यांना पेन व वही घेऊन गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले.
दरम्यान फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, बराच वेळ गेल्यानतंर मालक कारखान्यात आले नाही, परंतू सदर गाडी वळून सिन्नर फाट्याच्या दिशेने जातांना कामगारांनी पाहिली. त्यानंतर सोनवणे यांच्या पत्नी उज्वला यांनी कारखान्यातील एका कामगाराला फोन करुन पती शिरिष यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली, यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही, या नंतर शोधाशोध झाल्यानंतर फिरोज याने शनिवारी (दि.१०) नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली असून नाशिक शहरात गुन्हेगारीने डोके वाढ काढले आहे.