धक्कादायक: नाशिकच्या ‘या’ पतसंस्थेत पावणेतीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड
नाशिक (प्रतिनिधी): पतपेढीत तब्बल पावणे तीन कोटी रूपयांचा आर्थिंक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आडगाव येथील दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मल्हारी मते याच्यासह संचालक मंडळ आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखा परिक्षणात हा गैरव्यवहार समोर आला असून, अनियमीत कर्ज पुरवठा,संस्थेच्या नावाने कर्ज काढून रकमेचा गैरव्यवहार,ठेव रक्कम प्रत्यक्ष देणे, बनावट बचत खात्यातून परस्पर रकमा काढणे आदी आरोप करण्यात आले आहे.
लेखापरिक्षक संजय श्यामराव लोळगे यांनी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान हा गैरव्यवहार झाला आहे. दुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मल्हारी भागूजी मते व अन्य १५, व्यवस्थापक बाजीराव नामदेव कोल्हे व ५ जण, ओशियन बेवरेजेस प्रा.लि.चे चेअरमन बाबुराव विश्वनाथ बगाडे व २९ आणि माजी शाखा व्यवस्थापक भागिरत मते व अन्य ९ जणांनी २ कोटी ७६ लाख १ हजार ४० रूपयांचा घोटाळा केला आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8527,8512,8507″]
लेखापरिक्षक लोळगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०१३ ते मार्च २०१५ दरम्यान संशयीतांनी संगनमताने बोगस नावाने बचत खाते उघडून त्यातून रकमा विड्रॉल केल्या आहेत. ठेव रकमा प्रत्यक्ष दिल्या तसेच पतसंस्थेतच संस्थेच्या नावाने कर्ज उचलून कर्ज खात्यातील रकमेचा गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. हा घोटाळा आजी माजी संचालक मंडळ,व्यवस्थापक ते बचत प्रतिनिधी,कर्जदार,ठेविदार आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या माध्यमातून झाला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक निरीक्षक गवळी करीत आहेत.