रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड
नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गाची स्थिती बऱ्यापैकी निवळलेली दिसत असली तरी ती पुन्हा कधी वेग धरेल सांगता येत नाही.
त्यामुळेच या संभाव्य परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत रेल्वे मंत्रालयानं रेल्वे प्रवाशांसाठी पुढील सहा महिन्यांसाठी कोरोनोच्या नियमावलीत वाढ केली आहे.
त्याचबरोबर रेल्वेच्या स्टेशनच्या परिसरात किंवा रेल्वेगाडीत जर कोणी प्रवाशी विनामास्क आढळला तर त्याला ५०० रुपयांचा दंड वसूल केला जाणार असल्याचंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
सणांचा काळ आता सुरु होत आहे. त्यामुळे उत्सवांसाठी आपापल्या घरी परतणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा प्रकारे रेल्वेत गर्दी होऊन त्यामुळे कोरोनाच्या संसर्गवाढीला पुन्हा निमंत्रण मिळू नये यासाठी एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून कोणताही निष्काळजीपणा होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ:
उत्सवांच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वेने अनेक गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मुंबईच्या मार्गावर रेल्वेवर प्रवाशांच्या भार सर्वाधिक असतो. या पार्श्वभूमीवर रेल्वेने मुंबई मार्गावर चालणाऱ्या १८ उत्सव विशेष रेल्वेच्या फेऱ्या ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. या सर्व रेल्वेच्या फेऱ्यांची मर्यादा ३१ ऑक्टोबरला संपणार होती. प्रवाशांची वाढती संख्या पाहता या रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये पाच महिन्यांसाठी वाढ करण्यात आली आहे.