नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतगर्त कोट्यवधी रुपयांच्या उड्डाणपुलाचे काम जवळजवळ ८० टक्के पूर्ण झाले असून मुख्य उड्डाणपुलाला तो जोडण्यासाठी पुढील महिन्यापासून वाहतूक व्यायवस्थेमध्ये बदल करण्यात येणार आहेत. पुलाचे काम मार्च पर्यंत पूर्ण होणार होते परंतु, मध्ये काही महिने काम बंद असल्याने आता ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जत्रा हॉटेल पर्यंत ठिकठिकाणी होणारी मोठी वाहतूक कोंडी व अपघातांचे वाढते प्रमाण यामुळे हा पूलबांधणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. केंद्रसरकारने त्याला मान्यता दिली होती. उड्डाणपुलाचे काम तीन वर्षांपासून सुरु आहे. या विस्तारित उड्डाणपुलाच्या कामाचे नारळ २०१६ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फोडण्यात आले होते. परंतु कामामध्ये काहींना काही अडथळे येऊन ते दोन वर्षे खोळंबले. नकाशा तयार होणे ते निधीची तरतूद व प्रत्यक्ष निविदा तयार होऊन काम सुरु करण्यात दोन वर्षे निघून गेले. मग कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली ती २०१९ पासून. हा उड्डाणपूल चालू नवीन वर्षांमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.