नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांनी संगमनेर मार्गे मुंबईला ३ टन गोमांस घेऊन जाणारा आयशर टेम्पो जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अल्ताफ अली शेख (वय 45) व जुनेद नूर मोहम्मद शेख (वय 20) हे दोघेही जुने नाशिकचे रहिवाशी आहेत. भगूर लहवीत रोडवरील सावन व्हिला येथे शुक्रवारी (दि.३०) पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिसांनी संबंधित संशयित आरोपी यांचा आयशर टेम्पो (एमएच १५ जीव्ही ४१५१) ताब्यात घेतला. यामध्ये पोलिसांना तपासणी दरम्यान ३ टन गोमांस आढळून आले.
रात्री गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर, पोलीस शिपाई मनोहर साळुंखे, इत्यादी पथकाला हा टेम्पो संशयास्पद वाटला. पथकाने या गाडीचा पाठलाग करून, गाडी अडवून चालकास प्रश्न विचारले असता, संशयितांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. म्हणून टेम्पो त्वरित देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. दरम्यान तपासणी केली असता गोमांस आढळुन आले. यामुळे भारतीय दंड विधान कलम ४२९ गोवंश हत्या बंदी व प्राणी संरक्षण अधिनियम ५ क, ९ अ प्रमाणे संशयित आरोपी अल्ताफ शेख व जुनेद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.