दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, कृषि मंत्री दादाजी भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित,विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले,  शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.  जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी लसीकरणाबाबत दुर्गम भागातील जनतेला दिला विश्वास

मुख्यमंत्री  ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली.  दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका.

कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने  घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकारणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला.  ठाकरे यांनी लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शितपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांनी पोषण पुर्नवसन केंद्राला भेट देऊन कुपोषीत बालकांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.

यावेळी मुख्यमंत्री  ठाकरे यांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपारिक पिकांची माहिती घेतली.   त्यांनी रानभाज्या पिकविण्याऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले.  रानभाज्याना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तोरणमाळ विद्युत उपकेंद्रासाठी सहकार्य करणार

मुख्यमंत्री ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ येथील विद्युत उपकेंद्रासाठी 16 कोटींचा प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

हे उपकेंद्र पुर्णत्वास आल्यास अक्राणी अक्कलकुवा व परिसरातील 200 गावे व साधारण 11 हजार ग्राहकांना याचा लाभ होणार आहे.  या उपकेंद्रातून 33 के.व्ही. दाबाने धडगांव, हातधुई, मोलगी, जमाना, काकरदा, पिंपळखुटा या गावांना विजपुरवठा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील 220 गावांना शहादा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे 33 के.व्ही. वाहीनीची लांबी कमी होणार असून त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी वीजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांचे मोलगी येथे स्वागत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी हॅलिपॅडवर आगमन झाले. आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  आणि कृषि मंत्री दादाजी भुसे  यांनी त्यांचे स्वागत केले.  त्यांच्या समवेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि आरोग्य सचिव प्रदीप व्यास होते.

ॲड. पाडवी यांनी सातपुड्यातील डाब येथील स्ट्रॉबेरी मुख्यमंत्र्यांना भेट दिली.  प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार मंजुळा गावीत, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, आमश्या पाडवी आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790