नाशिक (प्रतिनिधी) : कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाची दिवाळी वेगळी ठरणार आहे. हीच दिवाळी अधिक सुरक्षित करत उत्साह आणि आनंद वाढविण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप.सोसायटी लि.कडून ‘सेल्फी सेल्फी रांगोळी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठेही गर्दी करायची नसून घरासमोर काढलेल्या रांगोळी सोबत आपला पारंपरिक वेशभूषेतला सेल्फी काढून पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी १४ नोव्हेंबरला काढलेला रांगोळीसोबतचा सेल्फी १६ नोव्हेंबरपर्यत पाठवायचा आहे.
लोकमान्यकडून नेहमीच अनेक विविध उपक्रम राबविले जातात. ही परंपरा कायम ठेवत यंदा दिवाळीसाठी अनोखी रांगोळी स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाने ठिपक्यांची अर्थात पारंपरिक रांगोळी, संस्कार भारती रांगोळी किंवा मुक्तहस्त रांगोळी यापैकी एक रांगोळी काढायची आहे. त्यानंतर सदरच्या रांगोळीसोबत आपला पारंपरिक वेशभूषेतला सेल्फी काढून पाठवायचा आहे.
ही स्पर्धा सगळ्यांसाठी खुली असून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क भरायचे नाही. मात्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा हा फॉर्म लोकमान्यच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेचे परीक्षण करतांना सुबक आणि आकर्षक रांगोळीला महत्व दिले जाणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असणार आहे. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लोकमान्यकडून केले जात आहे. अधिक माहितीसाठी मोबा ८४०८०९०७००, ८६६८३२२८५२ संपर्क करता येईल.