त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, आता चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याची दहशत, आता चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्यात पशुधनासह मानवी वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. यात बहुतांश बालकांचा आपला जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुन्हा एका चार वर्षीय बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी याच भागातील वेळुंजे परिसरात आठ वर्षीय मुलाचा बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेला काही महिनेच उलटले नाहीत तोच पुन्हा वेळुंजे परिसरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ब्राह्मणवाडे गावानजीक वस्तीवर बिबट्याने हल्ला चढविला आहे.

नयना नवसु कोरडे असे या बालिकेचे नाव आहे. बुधवारी (दि. १५ मार्च) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात आपला मोर्चा वळवल्याचे या घटनावरून दिसून येते. जुलै 2022 तालुक्यातील धुमोडी परिसरात आठ वर्षीय मुलगी बिबट्याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर याच परिसरातील वेळुंजे गावानजीक असलेल्या दिवटे वस्तीजवळ बिबट हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्याने चार वर्षीय मुलीवर हल्ला केला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्राम्हणवाडे गावातील मळे परिसरात सायंकाळच्या सुमारास मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना तसेच परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने चार वर्षीय मुलीवर झडप घातली. तिला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला. स्थानिकांच्या  ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांचे शोध कार्य सुरू असताना काही अंतरावर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान वेळुंजेसह ब्राम्हणवाडे, धुमोडी हा संपूर्ण जंगल परिसर आहे. येथील पूर्णतः जंगल व्याप्त असल्याने बिबट्याचा अधिवास क्षेत्र बनले आहे. मात्र हळूहळू भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या गावात वावर वाढू लागला आहे. पशुधनावर हल्ला करून शिकार करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हल्ली लहान मुलांवरही हल्ले होत असल्याने ब्राम्हणवाडे, वेळुंजेसह धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790