नाशिक(प्रतिनिधी): नाशिक शहरात नवीन नियुक्त झालेले पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आयुक्तातील परिमंडळ १ व २ मधील सर्व १३ पोलिस ठाण्यातील डीबी म्हणजेच गुन्हे शोध पथकामध्ये काही फेरबदल केले आहेत. त्यानुसार डीबीमधील अधिकारी व कर्मचारी यांची बदली केली असून त्यांची नेमणूक इतर ठिकाणी पोलिस चौकीत केली आहे. यानिमित्ताने नवीन पोलिस कर्मचाऱ्यांना नवीन संधी प्राप्त झाली आहे.
पोलीस आयुक्तांनीच याबाबत आदेश काढल्यामुळे यासंदर्भात कोणालाही हस्तक्षेप करता येणे शक्य नाही. शहरांमध्ये तेरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. तसेच शोध पथकाचे कर्मचारी व अधिकारी वर्षानुवर्ष तेथेच काम करत होते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी या विभागात जणू स्वतःची मक्तेदारीच प्रस्थापित केली होती. तरी आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हे शोध पथकातील या बाबी लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.