ठक्कर बाजार: दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तीन संशयितांनी तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ठक्कर बाजार परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी संशयित अमित व्यवहारे, वैभव प्रकाश बागुल आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि सागर सोनवणे (रा. नेहरूनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ठक्कर बाजार येथून पायी जात असताना ओळखीचे अमित व्यवहारे, वैभव बागुल आणि त्यांचा अनोळखी मित्र यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सोनवणे यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. व्यवहारे याने लोखंडी रॉड डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सागर सोनवणे याला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.