नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाकडून घेण्यात आला होता. कोरोना रुग्णांचे प्रमाण पहिल्यापेक्षा बरेच कमी झाले असले तरी शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांनंतरच शाळा सुरु करण्याबाबत निश्चिती होणार आहे. यामुळे काल (दि.२८) पासून शहरासोबतच ग्रामीण भागातील शिक्षकांच्या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय पूर्णपणे स्थानिक प्रशासनावर सोडला होता कारण प्रत्येक ठिकाणची कोरोनावरील परिस्थिती वेगवेगळी होती. नाशिक जिल्ह्यात हा निर्णय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. त्यासाठी फक्त शिक्षकच नव्हे तर, तेथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या देखील कोरोना चाचण्या करणे बंधनकारक केले होते. त्यानुसारच पुढील नियोजन करण्यात येणार आहे. या आठवडाभरात जिल्ह्यातील साधारणपणे १३ हजार शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण होणार असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.