नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक झूम ॲपद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार असल्याने अर्जदरांनी आपले अर्ज जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे ई-मेल अथवा व्हॉट्सॲप प्रणालीद्वारे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमुद केल्यानुसार, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येते. परंतू कोविड-19 चा वाढत्या प्रार्दूभावामुळे खबरदारी म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक झुम ॲपद्वारे ऑनलाईन पद्धीतीने घेण्यात येणार आहे.
ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या बैठकीसाठी अर्जदारांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे अर्ज सादर करतांना संपूर्ण नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक स्पष्ट नमुद करून आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह अर्ज PDF स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 9421954400 या व्हॉटस्ॲप ग्रीव्हीन्स क्रमांकवर पाठविण्यात यावा. सदर बैठकीचा आयडी व पास वर्ड जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य व अर्जदार यांना कळविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.