शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
नाशिक (प्रतिनिधी): गॅस पाईपलाईनच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. केबल तुटल्याने विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. या समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका शहर अभियंता नितीन वंजारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. २४ (नवीन ३०) मध्ये गेल्या काही दिवसांपासून गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदले जात आहेत. यामुळे अनेक ठिकाणी केबल तुटल्याने विद्युत पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. पाण्याच्या पाईपलाईन काही ठिकाणी फुटल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे. खोदलेले रस्ते पूर्ण बुजवलेले नाहीत, मातीच्या ढिगार्यांमुळे रस्त्यांची आणखी दुरावस्था झाली आहे. स्ट्रीटलाईटही बंद पडले आहेत.
कालिका पार्क, जगतापनगर, प्रियंका पार्क आदी भागातील नागरिकांना याचा त्रास होत आहे. मातीवर पाणी टाकून रोलरने रस्त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे. वरील सर्व समस्या सोडविण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा प्रभागात संबंधित ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, विनोद पोळ, संजय टकले, मनोज वाणी, अशोक पाटील, नीलेश ठाकूर, डॉ. शशीकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, दिलीप दिवाणे, बाळासाहेब दिंडे, रमेश देशमुख, शैलेश महाजन, सोमनाथ काळे, पुरुषोत्तम शिरोडे, मीना टकले, वंदना पाटील, सरीता पाटील आदींसह रहिवाशांनी दिला आहे.