कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांनुसार पर्यटनस्थळे राहतील खुली…
नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सव साजरा करतांना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी बैठकीस उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गणेशोत्सव काळात महानगरपालिका व पोलीस यंत्रणांकडून आवश्यक सर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरीता नागरिकांनी सुध्दा गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.
जिल्ह्यात प्रस्तावित असणाऱ्या 24 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पांचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील निर्बंधांबाबत महत्वाची बातमी…
रेमडेसिव्हीर व टॉसीलीझुमॅब मेडिकलमधून थेट वितरण होणार…