कोरोना काळात डॉक्टरांचा असाही संघर्ष…जाणून घ्या एका डॉक्टरच्याच अनुभवातून!

साधारण महिन्याभरापूर्वीची ही गोष्ट. मला पूर्णपणे अपरिचित असलेल्या एका तरुण रुग्णाची…! मी डॉ. शर्वरी माळी, नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करते. हा तरुण (जय नावाचा माझा पेशंट), त्याची रात्रभर चाललेली सर्जरी आणि आम्हा डॉक्टरांची टीम यांची ही गोष्ट म्हणजे एक ‘गुंफण’ आहे.

कोरोनाचा कहर चालू आहे म्हणून बाकीचे कहर थांबलेले नाहीत ! याचाच प्रत्यय त्यादिवशी आला, नात्यातली भांडणे टोकाला गेली, आणि निव्वळ बावीस वर्षाच्या या मुलाला एकाने धारदार चाकूने गळ्याला उजवीकडे भोसकले. तेही खूप खोलवर…खूप रक्त वाहीलं आणि जवळच्या एका डॉक्टरने छोटी जखम समजून टाकेही घातले. पण जखम दिसत होती तेवढी छोटी नव्हती. गळ्यातल्या उजवीकडच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन्ही मुख्य रक्तवाहिन्या, धमणी (Common Carotid Artery) आणि नीला (Internal Jugular Vein) यांना गंभीर इजा झाली होती. त्यातून रक्तस्त्राव सुरूच होता. या उजवीकडच्या रक्तवाहिन्या उजवीकडच्या मेंदूला रक्त पुरवठा करतात परिणामी उजव्या मेंदूचा रक्त पुरवठा कमी झाला. मित्रांनो.. समजून घ्या.. आपला उजवा मेंदू डाव्या बाजूच्या शरीराच्या हालचाली नियंत्रण करतो. जय वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आला, तेव्हा त्याची डावी बाजू अधू झाली होती, डावा पाय हलत नव्हता आणि डाव्या हातामध्ये किंचितच संवेदना होती.

जयच्या मेंदूच्या सी.टी, एम.आर.आय, सी.टी अँजिओ अशा तपासण्या झाल्या आणि जवळजवळ त्याच्या उजव्या अर्ध्या मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्याचं कळलं. रक्तवाहिन्यांच्या इजेमुळे तिथलं शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र मिसळत होतं आणि ही अत्यंत चिंताजनक बाब होती. जयला तात्काळ अतिदक्षता विभागामध्ये घेतलं गेलं. त्याचे रक्ताचे तपास पाठवले गेले. त्याचं हिमोग्लोबीन फक्त 6 ग्राम % झालं होतं (सामान्य स्थितीमध्ये हे 13 ते 17 ग्राम % इतकं असतं). एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेल्यामुळे रक्तदाब कमी होऊ लागला होता, गळ्याजवळ रक्त साठल्यामुळे श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. श्वासाचा त्रास अजून वाढण्याच्या आत त्याला श्वासनलिकेत नळी टाकण्यात आली. जयला लवकरात लवकर ऑपरेशनला घ्यावे लागणार होते. सर्जरी करूनच रक्तवाहिन्यांची दुरुस्ती करावयाची होती, तरच जयचा जीव वाचण्याची शक्यता होती. हातात वेळ खूप कमी होता. एका मोठ्या सुईतून जयला दोन पिशव्या रक्त दिलं गेलं आणि त्याला शस्त्रक्रियेसाठी घेण्यात आलं.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

या थरारनाट्यातले आम्ही सर्व कलाकार तेव्हा पीपीई किट मध्ये होते. जयचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाठवला गेले होता पण तो येईपर्यंत थांबणं शक्य नव्हतं. माझ्यासोबत व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शाहझाद बलसारा आणि डॉ. प्रविण नारखेडे, मेंदूविकार तज्ञ डॉ. विशाल सावळे पाटील, इमर्जन्सी विभाग आणि आईसीयुचे डॉ. कुलदीप देवरे, डॉ. प्रशांत उभाळे आणि वोक्हार्ट हॉस्पिटलची संपूर्ण नर्सेस आणि टेक्निशियनची टीम आपल्या जीवाची पर्वा न करता घरादाराची चिंता विसरून रात्री 10 वाजता रुग्णाचा जीव वाचायला तिथे हजर झाले.

आता पुढचं थरार नाट्य…जयचं ऑपरेशन तर करायचंच होतं, पण त्याला भूल देणं खूप जोखमीचं होतं. गळ्यातून सलाईनसाठी नळी टाकायची गरज होती, पण ते शक्यच नव्हतं. मग त्याला मांडीतून नळी टाकण्यात आली. मेंदूचा उरलेला रक्तप्रवाह सुरळीत चालू राहावा, त्यात गुठळ्या होऊ नयेत, मूत्रपिंडांना बाधा होऊ नये, रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित रहावं या अनेक गोष्टींकडे भूलेदरम्यान खूप लक्ष देण्यात आलं. थोडे थोडके नाही, तब्बल सात तास हे ऑपरेशन चाललं. रक्तवाहिन्याना जिथे जखम झाली, ती जागा प्रथम शोधली गेली, मग त्याच्या वर आणि खाली छोटे चिमटे लावून रक्तप्रवाह तात्पुरता बंद केला गेला आणि रक्तवाहिन्या परत शिवल्या गेल्या. किती नाजूक आणि गुंतागुंतीची सर्जरी होती ती…आज त्याची कल्पनाही करवत नाही. रात्रभर हे थरारनाट्य चालले. रात्रभर सर्जन, मी आणि आमची पूर्ण टीम पी.पी.ई किटमध्ये राबत होतो. सकाळी सहा वाजता जयला कृत्रिम श्वासाच्या मशीनवर आईसीयु मध्ये पाठवलं.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

अशा या केसेस मध्ये माझी आणि एकूणच सर्वांची भावनिक गुंफण होते, दिवस रात्रीचं भान नाहीसं होतं. खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि पेशंटला या संकटातून बाहेर काढण्याची एक जणू नशाच असते. पुढे काय झालं?? मित्रांनो, दुसऱ्याच दिवशीपासून जयच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. अधू झालेली डावी बाजू परत काम करू लागली. कृत्रिम श्वासाचं मशीन काढण्यात आलं. चौथ्या दिवशीच जय आधार घेऊन चालू लागला, परत खाऊ पिऊ लागला. सातव्या दिवशीपर्यंत त्याला चालण्यासाठी फक्त थोडाफार काठीचा आधार लागत होता.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

दहाव्या दिवशी जयला घरी सोडण्यात आलं. अर्धी बाजू कमकुवत होऊन हॉस्पिटलला आलेला जय त्याच्या पायांनी चालत घरी गेला…तो आमच्यासाठी एक भावनिक क्षण होता. मित्रांनो, कोरोनाने पछाडलेल्या या दिवसांमध्येही हे विसरू नका, की सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पिटल स्टाफ स्वतःचे जीव पणाला लावून सर्व वैदकीय आपत्ती, इमर्जन्सी हाताळत आहेत. आम्ही वैद्यकीय कर्मचारी सुद्धा माणूस आहोत ह्याचा बऱ्याच वेळा समाजाला विसर पडतांना दिसतो. पीपीई किट घालून तासंतास काम करणे, खाण्या-पिण्याच्या वेळा चुकणे, वैयक्तिक आणि कुटुंबाला वेळ न देता सदैव रुग्णसेवेसाठी तत्पर असणे हा आमच्या जीवनाचा जणू नित्यक्रम झाला आहे. एका घरात राहून सुद्धा आम्हाला आमच्या मुलांना जवळ घेता येत नाही, रुग्णांना बरं करतांना कुटुंबाला या जीवघेण्या रोगाचा संसर्ग होऊ नये हीच अपेक्षा सदैव मनात असते. रुग्ण बरा झाला कि त्याच्या आप्तेष्टांपेक्षा अधिक आनंद त्याला उपचार देणाऱ्या डॉक्टरला होतो कारण तोच त्या रुग्णाचे दुःख जवळून अनुभवत असतो. रुग्ण आणि डॉक्टर मधली भावनिक गुंफण शब्दात मांडणे शक्य नाही, तुम्हाला या भावनांची अनुभूती व्हावी यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.

जयची ही केस माझ्यासाठी कायमच अविस्मरणीय आणि अभिमानास्पद अनुभव राहणार आहे, हे मात्र नक्की !

(रुग्णाची माहिती उघड करणे नियमबाह्य असल्या कारणाने, या लेखामध्ये रुग्णाचे नाव बदलण्यात आले आहे)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790