नाशिक (प्रतिनिधी): भौगोलिक स्थिती नुसार केंद्र सरकारने देशात जवळजवळ ३५ लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नाशिकचा नंबर पहिल्याच टप्प्यात लागणार आहे. हा लॉजिस्टिक पार्क सुमारे १०० एकर जागेवर होणार असल्याने नक्कीच मोठा फायदा होणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, शेतकरी व लहान उद्योजकांच्या मालासाठी कोल्डस्टोरेज व वेअरहाऊस बांधणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. जिल्ह्यात सात ते आठ मोठ्या औद्योगिक वसाहती असून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होणारे द्राक्ष व कांदा साठवणुकीची काहीही व्यवस्था नसल्याने शहरालगत लॉजिस्टिक पार्क बांधण्याची मागणी होती. हा प्रकल्प पुढील दोन वर्षांमध्ये उपयोगात आणला जाणार असल्याने जिल्ह्याचाच नव्हे तर पर्यायाने महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागणार आहे. केंद्र सरकारच्या लॉजिस्टिक पार्कसाठी पाचशे कोटींची गुंतवणूक होणार असून लवकरच तांत्रिक समितीचा सल्लागार अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.