नाशिक(प्रतिनिधी): प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय अभियान समिती बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रमेश शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अजित सुरसे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, निफाड जिल्हा विस्तार केंद्राचे कवक शास्त्रज्ञ डॉ. बबनराव झाल्टे, तंत्र अधिकारी जितेंद्र शहा यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यावेळी म्हणाले की, कृषी विभागाच्या योजना या शेतकऱ्यांच्या हितासाठी व विकासासाठी आहेत. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व योजनांची कृषी विभागाने प्रभावीपणे जनजागृती करावी जेणेकरून या योजनांचा लाभ सर्व तळागाळातील शेतकरी घेऊ शकतील.
शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने एकच पीक न घेता पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. यासाठी तालुकास्तरावर शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्षेत्रनिहाय आपल्या शेतात कोणती पिके घेणे शक्य आहेत, याची माहितीही देण्यात यावी. जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात भात लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्हास्तरीय 29 महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांची कामे ऑगस्ट 2022 अखेर पूर्ण करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
![]()


