कसारा घाटात ट्रक आणि आयशरचा अपघात; एक ठार, एक जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंट जवळ पहाटेच्या वेळेस मोठा अपघात झाला आहे. केळीने भरलेल्या ट्रकने आयशरला मागून धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक पलटी झाला असून ट्रक खाली पडल्याने चालकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
मुंबई – आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटात एका ट्रकने – आयशर टेम्पोला धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाला असून अपघातामुळे काहीकाळ कसारा घाटात वाहूतक ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मुंबई – आग्रा महामार्गावरून मुंबईला जाणाऱ्या एका ट्रकने केळी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोला धडक दिली.
यात आयशर टेम्पो थेट एका दरडीवर धडकला, तर ट्रक पलटी झालेला होता. या अपघातात पप्पू यादव नामक व्यक्तीचा मृत्यू झाला असून शितल यादव नामक व्यक्ती गंभीर जखमी आहे.
तसेच या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला कळविल्यानंतर व्यवस्थापनाचे प्रकाश शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर अपघात भीषण असल्याने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला तात्काळ बोलवून जखमीला रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, यानंतर पोलिसांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर घोटी केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपत्ती व्यवस्थापनाच्या सदस्यांच्या आणि खासगी क्रेनच्या मदतीने मदत कार्य केले. यानंतर आयशर टेम्पोमधील जखमीला बाहेर काढले तर दीड ते दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात आले.