नाशिक (प्रतिनिधी): आरोग्य विज्ञान विद्यापीठाला गेली अनेक वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली आहे. अचानक त्यांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र याबाबत न्यायालयात जे दावे प्रलंबित आहेत, त्यांचे अवलोकन करून आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, उपकुलसचिव डॉ. उदयसिंग रावराणे, विधी अधिकारी संदीप कुलकर्णी, तानाजी जायभावे, डॉ. डी. एल. कराड उपस्थित होते.
जवळपास ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे सेवा दिली आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा तसेच भविष्याचा विचार करतांना आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासनाने
न्यायालयात जे दावे प्रलंबित आहेत, त्यांचे अवलोकन करावे. या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा सहानुभूतीवूर्वक विचार करावा, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी बैठकित सांगितले