अरे व्वा ! ओझर विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे !
नाशिक : ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्याची पाहणी शुक्रवारी (ता.१९) खासदार हेमंत गोडसे यांनी केली. इमिग्रेशनची परवानगी मिळताच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
विविध विभागांच्या परवानगी प्राप्त
नाशिक (ओझर) विमानतळावरून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत देशांतर्गत विमानसेवा सुरू आहे.
दिल्ली, बेळगाव, अहमदाबाद, हैदराबाद, पुणे, सुरत या शहरांसाठी सुरू असलेल्या सेवेचा विस्तार सुरू आहे. त्याचबरोबर आता परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी होती.
देशांतर्गत सेवेला प्रतिसाद मिळत असल्याने ओझर येथून आंतरराष्ट्रीय हवाईसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न होते. आंतरराष्ट्रीय हवाई सेवेच्या प्रस्तावाला दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर विमानतळावर पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एचएएलने दोन कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9117,9110,9102″]
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या विभागांच्या सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत. पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या असून, विविध विभागांच्या परवानगीही प्राप्त झाल्याने आता ओझर विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. गोडसे यांनी येथील ओझर विमानतळावर सुविधांची पाहणी केली.