ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नाशिक (प्रतिनिधी): कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या अनुषंगाने ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या प्रत्येक रुग्णांना तो पुरेसा उपलब्ध होणे गरजेचे आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने उत्पादक कंपन्यांनी निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ऑक्सिजन पुरवठ्याबाबत ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मांढरे बोलत होत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जेजुरकर यांच्यासह ऑक्सिजन निमिर्ती करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांनी ऑक्सिजनची निर्मिती वाढवून सद्या पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन व्यतिरिक्त किमान 10 टक्के अधिक ऑक्सिजनचा पुरवठा शासकीय रुग्णालयांना करण्यात यावा. तसेच अप्पर जिल्हाधिकारी नडे यांनी मालेगाव येथील यंत्रणेशी समन्वय साधून उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनपैकी काही प्रमाणात ऑक्सिजन मालेगाव येथे देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील 148, ग्रामीण भागातील 70 व मालेगावमधील 34 अशा एकूण 252 रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत बंद असलेल्या कंपन्यांकडून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून घेवून ते सिलेंडर उत्पादक कंपनींना देण्यात यावेत. जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा करतांना उत्पादक कंपन्यांना अडचण येणार नाही, यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले.
आज आपल्याकडे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजन च्या तुलनेत ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. यावर साधनसामुग्रीच्या माध्यमातून नियंत्रण मिळविणे थोडे कठीण असले तरी प्रशासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नागरिकांनीच स्वत: पुढाकार घेवून ब्रेक द चेन च्या अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे जास्त गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.