अभिमानास्पद: ‘एनसीएफ’कडून शरण्या शेट्टी यांना आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक पुरस्कार

‘एनसीएफ’कडून शरण्या शेट्टी यांना आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक पुरस्कार

नाशिक ( प्रतिनिधी): आपल्या सभोवताल आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन्स फोरम’तर्फे ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार सुरू करण्यात येत आहे.

हा पुरस्कार दरमहा एका व्यक्तीस दिला जाणार असून अनाथ व आजारी प्राणी-पक्ष्यांसाठी ‘शरण फॉर अॅनिमल’च्या माध्यमातून कार्यरत असलेल्या श्रीमती शरण्या शेट्टी या जानेवारी महिन्यासाठी ‘आउटस्टँडीग सिटीझन ऑफ नाशिक’ ठरल्या आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: नवनवीन गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीसांची भूमिका आव्हानात्मक- न्यायाधिश जगमलानी

गेल्या पंधरा वर्षांपासून अनाथ प्राण्यांसाठी शरण्या शेट्टी या कार्यरत आहेत. त्यांनी २००५ साली स्थापन केलेल्या ‘शरण फॉर अॅनिमल’ या स्वयंस्वी संस्थेने आजवर हजारो प्राणीपक्ष्यांना सहारा दिलेला आहे.

प्रारंभी केवळ रस्त्यावरील श्वानांसाठी मदतकार्य करणाऱ्या या संस्थेचा व्याप दिवसेंदिवस वाढत जाऊन तिथे अनेक प्रकारच्या प्राण्यांना सहारा मिळू लागला. संकटातून सुटका, वैद्यकीय उपचार आणि निवारा अशा तीन स्तरांवर ‘शरण’ प्रामुख्याने काम करते. या संस्थेने आजवर दीड हजारांपेक्षा अधिक प्राणी-पक्ष्यांची संकटातून सुटका केली असून सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोनशे प्राण्यांना ‘शरण’ निवारा देते. प्राण्यासाठी अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देणारी ‘शरण’ ही नाशिकमधील एकमेव संस्था आहे.

महापालिकेने विल्होळी येथील कचरा डेपोसमोर दिलेल्या जागेत शरण्या शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शरण’चे निवारागृह उभारण्यात आले असून तिथे जखमी व आजारी प्राण्यांची सुश्रृषा केली जाते. या ठिकाणी प्राण्यांची वैद्यकीय तपासणी, उपचार केले जातात. साधारणतः दररोज पन्नास प्राण्यांवर या ठिकाणी उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. बरे झालेल्या प्राण्यांच्या पुनर्वसनाचे कामही संस्थेमार्फत केले जाते. ‘शरण’मध्ये प्राण्यांवरील उपचारांसाठी एक्स रे, सोनोग्राफी आदी सुविधा उभारण्याचा व या निवारागृहाला अधिकाधिक इको फ्रेंडली बनवण्यासाठी शेट्टी प्रयत्नशील आहेत. जानेवारी महिन्यात संक्रांतीदरम्यान नॉयलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्या प्राणीपक्ष्यांच्या मदतीसाठी ‘शरण’ने हेल्पलाईन देखिल उपलब्ध करून दिली होती.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर्स ट्रेडिंगचे आमिष दाखवून लिंक पाठवत ३९ लाखांना गंडा

 “नाशिकच्या सुनियोजित प्रगतीसाठी ‘नाशिक सिटीझन्स फोरम’ विविध माध्यमातून प्रयत्नशील असते. औद्योगिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच नाशिकच्या नागरिकांचा एकंदरीतच जीवनस्तर उंचावण्याच्या हेतूने फोरम काम करत असते. त्यासाठी स्वच्छता, सुरक्षीतता, शिस्त, शिक्षण, कौशल्य विकास, पर्यावरण, सौंदर्यीकरण आदी नागरी विषयांबाबत सहमती घडवून आणणे आणि त्याबाबतच्या कामांना चालना देण्याचा फोरमचा उद्देश्य असतो. मात्र, या विषयांमध्ये संस्थात्मक कामांप्रमाणेच वैयक्तीक स्तरावरील योगदानाचेही मोल मोठे असते. कुणी संस्था उभारून तर कुणी एकांड्या शिलेदाराप्रमाणे धडपड करत असतो. कधी या प्रयत्नांची दखल घेतली जाते तर कधी नाही. म्हणूनच अशा लोकांना गौरवणे, त्यांची उमेद वाढविणे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरीत करणे या उद्देश्याने ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ची सुरूवात करत आहोत. ” -हेमंत राठी, अध्यक्ष, नाशिक सिटीझन्स फोरम

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790