नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे नवीन शक्कल लढवत महापालिका व आरोग्य विभागाकडून चक्क कचऱ्यात सापडलेल्या बिलाच्या पावतीवरून कचरा टाकणाऱ्यांचा शोध घेऊन दंड आकारला जात आहे. यामध्ये एका रेमंड कुशनच्या बिल पावतीच्या आधाराने १० हजार दंड आकारण्यात आला.
महापालिका व आरोग्य विभागाकडून स्वच्छ भारत अभियानामार्फत स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच महापालिका व आरोग्य विभागाकडून ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ संकल्पना खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणण्यासाठी अथक परिश्रम सुरु आहेत. त्यानुसार, कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, शनिवारी (दि.२८) रोजी मुंबई-आग्रा मार्गावर अस्वच्छता पसरवणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यात एक रेमंड कुशनचे बिल सापडले. बिलावरील पत्त्याच्या आधाराने पथकाने संपर्क साधत कारवाई करून १० हजारांचा दंड आकारला. स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे नाव स्वच्छ शहर म्हणून नावारूपास यावे यासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला काही नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकून पळून जाणाऱ्यांना जबर बसवण्यात येत आहे. तरी नागरिकांनी शहर स्वच्छतेला हातभार लावत सहकार्य करावे असे आवाहन महापालिका व आरोग्य विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.