आनंदवार्ता… मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती

अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.  भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) अधिकृत घोषणा  करण्यात आली आहे.

मान्सून आल्यानं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरीही समाधानी झाला आहे. आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

एका आठवड्याच्या विलंबानंतर आज केरळात मान्सूनचं  आगमन झालेलं आहे. देशात मान्सूनचं  आगमन झालेलं आहे. आज केरळमध्ये मान्सूननं धडक दिलीय. हवामान खात्यानं तशी माहिती दिलीय. लवकरच मान्सूनचं राज्यात आगमन होईल, असा अंदाज आहे.  जवळपास एक आठवडा उशिरानं मान्सून यंदा केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळं देशातील अनेक भागांमध्ये नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत.

तळकोकणात 16 जूननंतर दाखल होणार :
नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

विदर्भाला यलो अलर्ट:
हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी:
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, बिपरजॉय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्वीपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्वीपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपरजॉय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊस कमी प्रमाणात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790