नाशिक (प्रतिनिधी): बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता धनगर यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
शासनाच्या उपसचिवांनी श्रीमती धनगर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, लाचखोर उपनिबंधक सतिश खरे, श्रीमती सुनीता धनगर हे सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर उद्या (ता. ९) सुनावणी होणार आहे.
नाशिकरोड परिसरातील एका शिक्षण संस्थेने बडतर्फ केलेल्या मुख्याध्यापकाने त्याविरोधात शालेय न्यायप्राधीकरणकडे दाद मागितली असता, त्यांच्या बडतर्फीला स्थगिती मिळाली. मात्र संस्था त्यांना सामावून घेत नसल्याने त्यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता धनगर यांच्याकडे संबंधित संस्थेला आदेश देण्याबाबत पाठपुरावा केला.
त्यासाठी श्रीमती धनगर यांनी ५० हजार रुपयांची तर लिपिकाने पत्र काढण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. गेल्या २ जून रोजी महापालिकेतील दालनामध्ये श्रीमती धनगर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
श्रीमती धनगर या गेल्या बुधवारपर्यंत (ता. ७) पोलीस कोठडीत होत्या तर, सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.
लाचप्रकरणात अटक केल्यापासून त्यांना ४८ तासापेक्षा अधिक कालावधीमध्ये पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडीत असल्याने शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमान्वये त्यांना अटक करण्यात आल्याच्या दिवसांपासून शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश शासनाचे उपसचिव टि.वा. करपते यांनी दिले आहेत.
निलंबन काळात त्यांचे नाशिक महापालिका कार्यालय हेच मुख्यालय असून, या काळात त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
आज जामीनावर सुनावणी:
दरम्यान, शुक्रवारी (ता. ९) लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे, गेल्या १५ मे रोजी ३० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जिल्हा उपनिंबधक सतिश खरे यांच्याही जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.त्यामुळे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा मिळातो की त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढतो याकडे सहकार व शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.