नाशिक (प्रतिनिधी): आईच्या आठवणीत व्याकूळ झालेला १४ वर्षीय मुलगा कोणाला काहीही न सांगता घरातून पळून जात असताना लोहमार्ग पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात ताब्यात घेतले आहे. लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
याबाबत लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनामिक देवराज चौधरी (वय १४) हा जेलरोड, इंगळे नगर येथे आपल्या मोठ्या भावाकडे राहतो. त्याची आई आशा चौधरी यांनी दुसरा विवाह केल्याने त्या पतीसोबत दिल्ली येथे राहतात. आणि त्यांची मुलं नाशिक येथे राहतात अनामिक याला आईची खूप आठवण येत होती.
त्यामुळे आईच्या भेटीसाठी तो व्याकुळ झाला होता. त्याचा भाऊ त्याची समजूत काढून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता मात्र, अनामिक हा आईच्या भेटीच्या ओढीने निराश होता.
आईच्या भेटीसाठी निघालेला अनामिक नाशिक रोड रेल्वे स्थानकात इतर लोकांना कडून गाड्यांची माहिती घेत होता. यावेळी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे एक हवालदार हे प्लॅटफॉर्म क्र. २-३ वर गस्त घालत असताना त्यांना अनामिक चिंतेत दिसला. त्यांनी अनामिक याची चौकशी केली असता त्याच्याकडून त्यांना कुठलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
त्यानंतर त्यांनी त्याला विश्वासात घेतले असता त्याने रडत रडत ‘मला आईची खूप आठवण येत असल्याने दिल्ली येथे राहत असलेल्या आईकडे जात असल्याची माहिती दिली.
दरम्यान ,पोलीस ठाण्यात भेटीकामी आलेल्या विभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित, पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी अनामिकची व्यथा ऐकून आईच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या अनामिकचे त्याच्या आईशी फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर अनामिकचा भाऊ आकाश चौधरी याला बोलावून घेत अनामिकला त्याच्या ताब्यात देण्यात आले. नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालकावर येणारे संभाव्य वाईट प्रसंग रोखले गेले. १४ वर्षाच्या या बालकाला सुरक्षितरित्या पोलिसांनी त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.