अवैध धर्मांतरप्रकरणी नाशिकमधील एकासह उत्तर प्रदेशातील दोघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): उत्तर प्रदेशमधील कथित अवैध धर्मांतरण प्रकरणाची पाळेमुळे नाशिकपर्यंत पोहचली असून उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) रविवारी रात्री नाशिकमधील कुणाल चौधरी उर्फ आतिफ याच्यासह मोहंमद इद्रिस आणि मोहंमद सलीम (दोघेही मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) यांना अटक केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी समजते आहे.. याबाबत स्थानिक पोलिसांकडून गोपनीयता पाळली जात असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईला दुजोरा दिला.
संशयित कुणाल उर्फ आतिफ हा नाशिकरोडच्या आनंद नगर भागात मूकबधिर मुले, अपंगांसाठी रुग्णालय चालवत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
परदेशातून वेगवेगळ्या खात्यांतून तब्बल २० कोटी रुपये त्याच्या खात्यात आल्याची माहिती असून अद्याप त्याचा तपशिल उपलब्ध नाही. नोएडा परिसरातील अनेक हिंदू कुटुंबियांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले होते.
यामध्ये विशेषत: शारीरिक व्यंग असलेले आणि मूक बधिर अपंगत्व असलेल्या युवकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात असल्याचे समोर आले आहे.
या मोठ्या रॅकेटमध्ये आतापर्यंत तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे. याच आरोपींच्या संपर्कात असलेल्या रॅकेटचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या संशयित युवकाला नाशिक रोड परिसरातील आनंदनगर मधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत संशयिताचे नाव कुणाल चौधरी असे सांगितले जात असून तो विदेशात शिकण्यासाठी गेला असता त्याचे त्या त्याठिकाणी धर्मांतर केल्याचे समोर आले आहे. कुणालने जरी धर्मांतर केले असले तरी त्याच्या परिवाराने मात्र धर्मांतर केले नाही. त्याचे आई-वडील व इतर परिवार हा नाशिकमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या एटीएसने मुंबई एटीएसच्या मदतीने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. आनंदनगर परिसर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्याबाबत अधिक चौकशी पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले.
नाशिकमधील संशयिताने रशियात घेतले मेडिकल सायन्सचे शिक्षण, अनधिकृतपणे सुरु होती प्रॅक्टिस
मौलाना कलीम सिद्दीकीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत कुणाल उर्फ आतिफचे नाव समोर आले. रशियामध्ये मेडिकल सायन्सचे शिक्षण घेतल्यानंतर तो भारतात परतला. देशात मेडिकल सायन्सची पदवी घेतलेल्या उमेदवारास एम. सी. ए. परीक्षा द्यावी लागते. त्यात तो नापास झाला होता. त्याने अनधिकृत प्रॅक्टिस सुरू केली होती. दोन वर्षापासून संशयित कलीम सिद्दीकीच्या संपर्कात होता.