नाशिक (प्रतिनिधी) : नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. पुढील तीन वर्षांमध्ये इमारत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे.
मागील वर्षीच इमारत बांधण्याच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेने दोन वर्षापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या जागेवर १६ कोटी रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी शासन परवानगी, निधींची पुर्तता या बाबी पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. या इमारतीचे भूमिपूजन झाले असले तरी कोरोना, इमारतीचा निविदा व इतर कारणांमुळे काम पुढे सरकू शकले नव्हते. मात्र गेल्या महिन्यात निविदा मंजून करण्यात येऊन ३१ डिसेंबरला काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.