लोणावळ्याला होत जुळ्या मुलांचं बर्थडे सेलिब्रेशन, आणि आदल्याच दिवशी…
नाशिक (प्रतिनिधी): स्विमिंग पूलमध्ये पडून नाशिकच्या दोन वर्षीय मुलाचा लोणावळ्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
लोणावळा येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या पवार कुटूंबावर ही शोककळा पसरली आहे.
शिवबा पवार असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, अखिल पवार यांचे कुटुंबीय नाशिक येथे वास्तव्यास आहे.
अखिल आणि शिवानी पवार यांना जुळी मुलं आहेत. वैष्णवी आणि शिवबा अशी त्यांची नावं. या दोघांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पवार कुटुंबीय लोणावळ्याला गेले होते. या ठिकाणी त्यांनी एक व्हिला बुक केला होता. या व्हिलातच ते वाढदिवस साजरा करणार होते. सर्व पवार परिवार याठिकाणी एकत्र आले होते. शिवबाचे वडील चेक इन करत होते. रिसेप्शनच्या जवळच स्विमिंग टॅंक होता. यादरम्यान शिवबा व्हिलामध्ये खेळत होता. शिवबा खेळत खेळत स्विमिंग पूलजवळ गेला. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडला. शिवबा पाण्यात पडल्यानंतर त्याने स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला बाहेर येणे शक्य झाले नाही आणि त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
यावेळी शिवबाच्या कुटुंबियांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्विमिंग टॅंककडे धाव घेतली. त्याला बुडताना पाहून त्याच्या कुटुंबीयांनी पुलाकडे धाव घेत शिवबास बाहेर काढले. तसेच, त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.