श्रद्धांजली वाहायला आले अन् एकमेकांची फोडली डोकी, सरणासाठी रचलेल्या लाकडांनी केली मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): ज्येष्ठ लोककवी विनायक पठारे यांच्या अंत्यसंस्कारासाठी अमरधाममध्ये आलेल्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
राजकीय कारणातून कुरापत काढल्यानंतर दोन गटांनी सरणासाठी रचलेल्या लाकड्याच्या सहाय्याने एकमेकांना मारहाण केली आहे.
या मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात जाऊन परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहे.
पोलिसांनी दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील ज्येष्ठ कवी, गीतकार विनायक पठारे यांच्यावर सोमवारी दुपारी अमरधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पठारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनिल गांगुर्डे आणि प्रशांत गांगुर्डे आपल्या काही साथीदारांसह उपस्थित होतं. याचवेळी नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक राहुल दिवे देखील आपल्या काही कार्यकर्त्यांसह पठारे यांच्या अंत्यसंस्काराला आले होते.
यावेळी दिवे यांनी गांगुर्डे यांना शोकसभेतून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. पण गांगुर्डे यांनी श्रद्धांजली सभेतून निघून जाण्यास नकार दिला. यानंतर संशयितांनी सरणासाठी रचलेल्या लाकडांनी गांगुर्डे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे गांगुर्डे गटाने जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला, अशी तक्रार विक्रांत गांगुर्डे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणीत गांगुर्डे पिता-पुत्र जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, अनिल गांगुर्डे आणि इतरांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जयेश सोनवणे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी विक्रांत गांगुर्डे यांचा वाढदिवस होता. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावले होते. पण दिवे यांच्या घरातील महिलांनी हे बॅनर फाडून टाकल्याचा आरोप विक्रांत गांगुर्डे यांनी केला होता. याचा वादावरून कुरापत काढत दिवे यांनी गांगुर्डे पिता पुत्रांवर हल्ला केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये; नाशिकमध्ये एकाला अटक!
महत्वाची बातमी: या १८ रेल्वे गाड्या मेगाब्लॉकमुळे तीन दिवस रद्द