नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाकडून शाळा व महाविद्यालये काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात शिक्षकवर्गाला विनाकारण शाळेत तसेच महाविद्यालयात बोलावण्यात येते. त्यामुळे या पार्श्ववभूमीवर कनिष्ठ महाविद्यालयीन संघाकडून, ‘शिक्षकांना ठोस कारणाशिवाय शाळा व महाविद्यालयामध्ये बोलावू नये’, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन संघाकडून ही मागणी करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे. ऑनलाइन शिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात आलेले नाही. मात्र, शिक्षकांनी स्वतः शिकून हे कार्य चालू ठेवले आहे. त्यातही उत्तरपत्रिका तपासणीचे कोरोना काळात जोखमीचे काम शिक्षकांना करावे लागले. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या संसर्गाचा धोका असलेली कामे शिक्षकांना देण्यात आल्यामुळे काही शिक्षकांना जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र, जीव गमावलेल्या या शिक्षकांच्या कुटुंबियांना कुठलीच आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्यात येते. मात्र, शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना ते अद्याप मिळालेले नाही. शिक्षकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तर दुसऱ्याबाजूला शासनाकडून शिक्षकांना शाळा व महाविद्यालयामध्ये ५०% उपस्थिती अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन संघाकडून निवेदन करण्यात आले आहे. जर पालक विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात पाठवत नसतील तर शिक्षकांना देखील शाळेत, महाविद्यालयात बोलावण्याचा आग्रह धरू नये. त्यांना घरूनच ऑनलाइन माध्यमातून शिकवण्याचे कार्य करू द्यावे. जेणेकरून शिक्षकांचा जीव धोक्यात येऊ नये, अशा बाबींचा समावेश निवेदनामध्ये करण्यात आला आहे.