
रुळ ओलांडताना रेल्वे येताच साधू महाराज रुळांमधील जागेत झोपले, सुदैवाने बालंबाल बचावले
नाशिक (प्रतिनिधी): रेल्वे गाडी दुसऱ्या फलाटावर येणार असल्याचे समजताच एका साधूने लगबगीने खाली उतरुन रुळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न केला.
परंतु, त्याचवेळी दुसऱ्या बाजुने रेल्वे वेगाने येत असल्याचे दिसताच त्यांनी जीव वाचविण्यासाठी थेट रुळामधील मधल्या जागेत झोपून घेतले.
रेल्वेचे ६ ते ७ डबे वरुन गेले पण साधी जखमही झाली नाही आणि साधू महाराज बालंबाल बचावले.
‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचिती देणारा हा प्रसंग शेकडो प्रवाशांनी मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकात भरदिवसा अनुभवला.
सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास फलाट क्रमांक ३ वर ही थरारक घटना घडली. त्याचे झाले असे की, या साधूला वाराणसी (उत्तर प्रदेश) येथे जायचे होते. या मार्गाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्या या फलाट क्रमांक १ किंवा २ वर येतात. पण साधू फलाट क्रमांक ३ वर उभे होते.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10425,10417,10415″]
गाडी फलाट क्रमांक २ वर येणार हे त्यांना समजल्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी फलाटावरून थेट खाली उतरून लोहमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भुसावळकडून येणारी आणि मुंबईला जाणारी फैजाबाद-मुंबई साकेत एक्स्प्रेस ही गाडी फलाटावर येत होती. समोर गाडी पाहून साधू महाराजांनी लोहमार्गाच्या मधील मोकळ्या जागेमध्ये थेट झोपून घेतले. अवघ्या काही मिनिटांनी जागृत नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर गाडी जागीच थांबली. त्यानंतर लोहमार्गाच्या मधोमध झोपलेले हे साधू महाराज अलगद स्वत:च बाहेर आले आणि फलाटावरील सारे प्रवासी आश्चर्याने थक्क झाले. त्यांना साधे खरचटलेही नाही किंवा काही इजाही झालेली नव्हती. त्यांचा जीव वाचला. यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
त्यानंतर दुसऱ्या एका गाडीने हे साधू महाराज आपल्या इच्छितस्थळी निघून गेले. पण, या घटनेमुळे रेल्वेस्थानकात मोठी खळबळ उडून प्रवाशांचाही थरकाप उडाला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच या साधू महाराजांचा धावत्या रेल्वेखाली येऊनही जीव वाचला. अचानक घडलेल्या या घटनेने लोहमार्ग पोलिस तेथे धावून गेले. पण या साधूने ‘मुझे कुछ हुआ ही नही, तो आप मेरा नाम क्यो पुछते हो…’ असा उलट सवाल केला व नाव न सांगताच समोरच्या गाडीत तो जाऊन बसला. मग पोलिसांनीही हा साधूच दिसतो, म्हणून पुढे नावासाठी व इतर माहितीसाठी फारसा आग्रह धरला नाही अन् गाडीही तेवढ्यात निघून गेली.