नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील डागसौंदाणे भागात राहणाऱ्या महिलेचा रिपोर्ट काय आला हे विचारण्यासाठी गेले असता हॉस्पिटलमधील एकाने महिला निगेटिव्ह असल्याचे सांगून घरी जाण्यास सांगितले. मात्र डिस्चार्ज घेण्यासाठी गेले असता महिला पॉझीटिव्ह असून आपल्या जबाबदारीवर घेऊन जा असे सांगण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठल्याच प्रकारचं उत्तर मिळालं नाही. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली तर अधिकाऱ्याने समजुतीची भूमिका न घेता पोलिसांना बोलावून रुग्णाच्या नातेवाईकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
शहरातील एक औषध विक्रेते मयूर अलई यांचा नातेवाईक असलेल्या महिलेची प्रकृती बिघडल्याने डांगसौंदाणे येथे दाखल करण्यात आले. मात्र त्याठिकाणी पाच दिवस उपचार घेऊनसुद्धा प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्या ठिकाणहून नाशिक येथील शासकीय रुग्णलयात दाखल केले. ९ सप्टेंबर रोजी नाशिकमधील रुग्णलयात दाखल करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. रुग्ण महिलेच्या मुलाने ओढाताण करत रुग्णलयात दाखल केले. दाखल केल्यानंतर कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्याचा अहवाल काय आहे ही माहिती महिलेच्या मुलाला देखील सांगण्यात आली नाही. एकाने त्या वृद्धेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने घरी नेण्यास सांगितले. डिसचार्ज मागण्यासाठी गेले असता ती वृद्धा पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घेऊन जा असे सांगण्यात आले. याबाबत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही.
यंत्रणेच्या बेफिकीरपणाचा जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन एका अधिकाऱ्याची भेट घेतली. अधिकाऱ्याने समजुतीची भूमिका न घेता त्यांना बाहेर काढले. त्यानंतर मयूर अलई व वृद्धेच्या मुलाने उत्तर मिळाल्या शिवाय जाणार नसल्याचे सांगितल्याने अधिकाऱ्याने पोलिसांना बोलावून घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.