नाशिक – (प्रतिनिधी)
कोविड-१९ ला रोखण्यासाठी लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेट्स तसेच दोरखंडामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. पेठरोडवर आज (दि. ६) पहाटे पावणेपाच वाजता झालेल्या विचित्र अपघातात मनपाचे माजी स्वच्छता कर्मचारी किशोर चव्हाण यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी व मनपा सफाई कर्मचारी राजूबेन या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ रोडवरील शनी मंदिराजवळ ही घटना घडली. कोविड-१९ आटोक्यात आणण्यासाठी शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रस्त्यांवरील वाहतुकीला अटकाव करण्यासाठी प्रमुख चौक तसेच मार्गांवर बॅरिकेट्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, अनेकांना रात्रीच्यावेळी दोरखंड दिसत नसल्याचे या अपघातामुळे पुढे आले आहे. स्वच्छतेचे कर्तव्य बजावण्यासाठी पत्नीला रविवार कारंजा येथे सोडण्यासाठी सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास किशोर चव्हाण हे दुचाकीवरुन आरटीओ कार्यालय परिसरातून निघाले. ते पेठ रोडवरील शनी मंदिराजवळ आले असता रस्ता बंदसाठी लावण्यात आलेला दोरखंड त्यांना दिसला नाही. या दोरखंडाला अडकून,त्यांच्या दुचाकीची रस्त्याला धडक बसली. या अपघातात किशोर चव्हाण जागीच ठार झाले. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.