पंचवटी: स्मशानाजवळच्या झाडाला लावल्या होत्या काळ्या बाहुल्या, लिंबू, व्यक्तीचा फोटो…..

पंचवटी: स्मशानाजवळच्या झाडाला लावल्या होत्या काळ्या बाहुल्या, लिंबू, व्यक्तीचा फोटो…..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पंचवटीत गोदाघाटानजीक स्मशानबाजूच्या रस्त्याला लागून असलेल्या बाभळीच्या झाडाला काळी बाहुली, लिंबू, कोहळा, नारळ, उडीद, बिबा, कागदावर लिहिलेल्या मजकुराससह व्यक्तींचे फोटो अशा अंधश्रद्धा युक्त वस्तू खिळ्याने ठोकल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिसांच्या मदतीने त्या वस्तू काढून अंधश्रद्धा निर्मूलन केले.

पंचवटीतील स्मशानाच्या बाजूलाच असलेल्या बाभळीच्या झाडाच्या जाडजूड बुंध्याला दाटीवाटीने या वस्तू ठोकलेल्या होत्या. अमावास्या, पौर्णिमा अशा दिवशी हे प्रकार तेथे घडतात अशीही बाब यावेळी लक्षात आली. रहदारीच्या मुख्य रस्त्यालगत हे झाड असल्याने ते जाणाऱ्या-येणाऱ्याच्या नजरेला सहज दिसत असल्याने भीती बरोबरच अंधश्रद्धा पसरत होती. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. २०) या वस्तू काढल्या.

हे ही वाचा:  नाशिक: म्हसरूळला सहा लाखांचा गुटखा जप्त; म्हसरूळ पोलिसांची कारवाई !

करणी, भानामती, जादूटोणा असे बेकायदेशीर आणि अंधश्रद्धा पसरवणारे प्रकार करणारी व्यक्ती करणारी व्यक्ती याच परिसरातली असावी, असा अंदाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी अशा या भोंदूला शोधून, जादूटोणा विरोधी कायद्यान्वये त्याच्यावर कारवाई करावी, यासह शहर आणि परिसरात पर्यावरणाचे विद्रूपीकरण करणारे, लोकांमध्ये भीती व अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाईच्या आशयाचा फलक महापालिकेने तेथे लावावा. अशी मागणी अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, महेंद्र दातरंगे यांनी केली.

हे ही वाचा:  नाशिक: शासकीय नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक

अंधश्रद्धा युक्त वस्तू व कागदावर लिहिलेला, घरगुती इच्छा, अपेक्षांसह, संतापजनक मजकूर, मजकूर लिहिलेली पाने एकाच वहीची असणे आणि मजकूर जरी भिन्न असला तरी एकाच अक्षरात लिहिलेला असल्याचे दिसले. ज्यांच्यावर करणी, बाधा झाली किंवा दुश्मन व्यक्तीला त्रास व्हावा, त्या व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटोही इतर वस्तूंसोबत खिळ्याने ठोकलेला होता. बहुतेक मजकूर हा प्रादेशिक भाषेत तसेच उर्दूमध्येही होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790