नाशिक (प्रतिनिधी): थायलंड हॉलिडे पॅकेज स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका इसमाची 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुशील राजाराम सोनवणे (रा. स्वर रो-हाऊस, गोविंदनगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सोनवणे यांना परदेशात फिरायला जायचे होते. त्यादरम्यान, दि. 19 ते 23 जानेवारी या कालावधीत आरोपी रोहित शर्मा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.
थायलंड हॉलिडे पॅकेज स्वस्तात मिळवून देतो, असे शर्मा याने फिर्यादी सोनवणे यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेवून सोनवणे यांनी शर्मा यांच्या फेडरल बँकेच्या खात्यात 80 हजार रुपयांची रक्कम जमा केली.
दरम्यान, रक्कम स्वीकारूनही बरेच दिवस पॅकेजची तिकिटे न देता शर्मा याने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात रोहित शर्माविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.