नाशिक शहरातील या भागात बुधवारपासून (दि. ५ जानेवारी) एकेरी वाहतूक
नाशिक (प्रतिनिधी): स्मार्ट सिटीअंतर्गत विविध रस्त्यांचे काम सुरू होणार असल्याने शहरातील विविध रस्त्यांवर एकेरी वाहतूक तर काही मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
सर्वाधिक रहदारी असलेल्या रविवार कारंजा ते सुंदरनारायण मंदिरापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनी, मलवाहिका, पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने या मार्गावर बुधवार (दि. ५)पासून एकेरी वाहतुक सुरू करण्यात येणार आहे.
रविवार कारंजाकडून बिर्ला आय हॉस्पिटल, सुंदरनारायण मंदिराकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे.
मालेगाव स्टँडकडून आहिल्यादेवी होळकर पुलावरून रविवार कारंजाकडे जाणाऱ्या वाहतुकीस प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहनांसाठी मालेगाव स्टँड येथून वळण घेऊन मखमलाबाद नाका, रामवाडी, अशोकस्तंभ या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. या मार्गावर दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. तसेच शालिमारकडून रेडक्राॅस सिग्नलकडे जाण्यास प्रवेश बंद आहे. यामार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. या रस्त्यावरही नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
सीबीएस सिग्नलकडून कान्हेरीवाडी मार्गे कालिदासकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू होती. रस्त्याचे काम सुरू असल्याने यामार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामार्गावरील वाहनांसाठी सीबीएस मोडक सिग्नल, किटकॅट काॅर्नर, बी.डी. भालेकर मैदान या मार्गाचा वापर करावा. असे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.