नाशिक: मालकाचा विश्वासघात सराफी दुकानातून नोकराने चोरले 14 तोळे सोन्याचे दागिने
नाशिक (प्रतिनिधी): दुकानात काम करणार्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात करून सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मातोश्रीनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अजित श्रीकांत नागरे (वय 34, रा. टागोरनगर, नाशिक-पुणे रोड, नाशिक) यांचे मातोश्रीनगर, शांती पार्क येथे ड्रीम हेरिटेजमध्ये श्री सद्गुरू अलंकार नावाचे दुकान आहे.
या दुकानात संशयित सुरेंद्रकुमार कमलेशकिशोर वर्मा (रा. रामतीर्थ अपार्टमेंट, कलानगर, जेलरोड, नाशिकरोड) हा कामाला होता.
वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्मा हा विश्वासू नोकर असल्याने नागरे यांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र वर्मा याने दि. 20 ते 24 सप्टेंबरदरम्यान या दुकानातील 1 लाख रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 50 हजार रुपये किमतीची साडेअकरा ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत, 1 लाख 5 हजार रुपये किमतीची साडेतेवीस ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत, 70 हजार रुपये किमतीची 16 ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत, 45 हजार रुपये किमतीची साडेनऊ ग्रॅम वजनाची शॉर्ट पोत, 30 हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची एक सोन्याची वाटी, 25 हजार रुपये किमतीची सहाशे ग्रॅम वजनाची सोन्याची एक वाटी, 25 हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 35 हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 20 हजार रुपये किमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे बास्केट रिंग जोड, दहा हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे बास्केट रिंग जोड, तसेच 70 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची शॉर्ट पोत असा एकूण 6 लाख 30 हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज वर्मा याने दुकानातून मालकाच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेला.
या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सुरेंद्रकुमार वर्मा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोंढे करीत आहेत.