नाशिक: महसूलच्या आंदोलनास पोलिस आयुक्तांनी नाकारली परवानगी
नाशिक (प्रतिनिधी): महसूल अधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली आहे.
पोलिस आयुक्तांनी महसूल विभागाबाबत केलेले वक्तव्य मागे घेतले नसून येत्या काळात हा संघर्ष अजून पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, पोलिस आयुक्त पांडेय यांच्या पत्रातील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाली होती.
महसूल संघटनेने दिलेला अल्टिमेटमची मुदत संपली आहे. त्यांनी कोणतीही लेखी माफी मागितली नसून त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते ठाम आहेत.
त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे परवानगी मागितली होती. ती परवानगी आता त्यांनी नाकारली असून आयुक्तांनी काढलेल्या आदेशात महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलेले आहे. दरम्यान, या आंदोलनात सोमवारी (दि. ११) पोलिस आयुक्तालयाला घेराव घालण्याचा तसेच विभागीय आयुक्तालयात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला होता. याप्रकरणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील नाराजी व्यक्त करत हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे म्हटले होते.
संघटनेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही याबाबत पत्र देत कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे पोलिस आयुक्त पांडेय यांनीही पत्रावर ठाम असल्याचे सांगितल्याने तसेच पत्र मीडियात व्हायरल झाल्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याने महसूल कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहेत. पांडे यांनी लेखी स्वरूपात माफी न मागितल्यास सोमवारी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलिस आयुक्तालयाला घेराव घालू, असा इशारा दिला होता. यावेळी राज्यभरातून अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी दिली होती. मात्र, आता परवानगी नाकारल्याने महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.