
नाशिक: पगार काढून देण्याच्या मोबदल्यात स्वत:च्याच सहकाऱ्याकडून मागितली लाच
नाशिक (प्रतिनिधी): आपल्याच खात्यातील सहकाऱ्याकडून पगार काढून देण्याच्या मोबदल्यात १० हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा हिवताप अधिकाऱ्यासह २ आरोग्य सेवकांना ACB ने रंगेहाथ पकडले आहे.
शहरात लाचखोरीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळेच जवळपास दररोज किंवा दिवसाआड लाचखोर सापडत आहेत. दोन दिवसापूर्वीच जिल्हा उपनिबंधक सतीश खरे हा तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला होता.
त्यानंतर आज जिल्हा हिवताप अधिकाऱ्यासह दोन आरोग्य सेवक १० हजाराची लाच घेताना सापडले आहेत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार लाचखोरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.: १) श्रीमती वैशाली दगडू पाटील (वय ४९, जिल्हा हिवताप अधिकारी, रा. स्टेटस रेसिडेन्सी गंगापूर), २) श्री. संजय रामू राव, (वय ४६, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, रा. पाथर्डी फाटा), ३) श्री. कैलास गंगाधर शिंदे (वय ४७ वर्ष, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, रा. पांडव नगरी).
पाटील, राव आणि शिंदे यांनी आपल्याच सहकाऱ्याकडे १० हजाराची लाच मागितली. तक्रारदार हे आजारी असल्याने वैद्यकीय रजेवर होते. त्यानंतर ते कामावर हजर झाले. त्यानंतर त्यांचा पगार काढून देण्याचे मोबदल्यात हिवताप अधिकारी पाटील हिने १० हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकरणात राव आणि शिंदे हे सुद्धा सहभागी होते. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि शिंदे हा १० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले गेला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.