
नाशिक (प्रतिनिधी): विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले.

सोमवारी (दि. २२) दुपारी १२ वाजता शिलापूर गावाजवळील एका पेट्रोलपंपासमोर हा अपघात घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि तुषार शिंदे (रा. देशमाने) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कानिफनाथ श्रावण पगार (५०) व सुनीता कानिफनाथ पगार (४७, रा. सोमठाण, ता. येवला) हे दाम्पत्य औरंगाबादरोडने निफाडकडून असताना शिलापूरजवळ समाेरून आलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पाठीमागे बसलेल्या सुनीता पगार यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. कानिफनाथ पगार यांच्या डोक्यास व पोटास गंभीर मार लागला. नागरिकांनी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.