नाशिक जिल्ह्यात मेडिकल दुकानांमध्ये महिन्याभरात लावावे लागणार सीसीटीव्ही.. हे आहे कारण…
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी, औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जारी केले.
शेड्युल एक्स, एच व एच वन औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांसाठी हा आदेश सक्तीचा करण्यात आला आहे.
या आदेशाचे जिल्हा औषध नियंत्रण विभागाने ग्रामीणमध्येही तपासणी करून पालन झाले की नाही याची खात्री करावी. अन्यथा कठोर कारवाई करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मुलांमधील अमली पदार्थांचा होणारा गैरवापर व अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या प्रमुख उद्देशाने, तसेच अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी अमली पदार्थविरोधी मोहीम जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.
कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातील औषधविक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिलेल्या कालावधीत औषधविक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषधविक्रेते दुकानदारांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी नमूद केले आहे.
शेड्युल एक्स, एच व एच.1 औषधे व इन्हेलर विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांत सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावण्यात यावेत, जिल्हा औषध नियंत्रण विभागाने सर्व औषध विक्रेते दुकानादारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही पडताळणी करावी. असे आदेश दि. 23 मार्च २०२२ पासून लागू करण्यात आले असून दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे, महिनाभरात दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांचे आदेश आहेत.