नाशिकमध्ये तापाचे ३००० रुग्ण; अतिसार, डेंग्यू, स्वाइन फ्लूने डोके वर काढले
नाशिक (प्रतिनिधी): सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तापसदृश आजाराच्या तीन हजारांवर रुग्णांची नोंद झाली आहे.
तापाबरोबरच अतिसाराची रुग्णसंख्याही हजारापार गेली आहे.
तर डेंग्यूचे २४ तर स्वाइन फ्लूचे २३ रुग्ण गेल्या महिन्यात आढळले आहेत. ही सरकारी आकडेवारी असून खासगी रुग्णालय तसेच फॅमिली डॉक्टरकडे उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षाही अधिक आहे.
काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस, त्यानंतर पडलेले कडक ऊन आिण पुन्हा झालेला पाऊस अशा विचित्र वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यांमुळे व डासांमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळाले असून गेल्या दोन वर्षांनंतरच प्रथमच स्वाइन फ्लूचेही रुग्ण नाशकात आढळले.
जून महिन्यात स्वाईन फ्लूचे २ रुग्ण असताना जुलै महिन्यात हीच संख्या २३ वर गेली. जुलै महिन्यात डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले. पालिकेच्या रुग्णालयात जुलैत तापसदृश आजाराच्या ३०५८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर चिकुनगुन्याचेही दाेन रुग्ण आढळून आले आहेत.
सर्दी, खोकला व ताप या संबंधित रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयांमध्ये अधिक आहे. अनेक रुग्ण फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने घरीच उपचार घेत आहे. सद्यस्थितीत तापाचे रुग्ण: ३०५८, स्वाइन फ्लू: २४, डेंग्यू: २३, अतिसार: १११२, चिकुनगुन्या: २ अशी रुग्णसंख्या आहे…!