नाशिक (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यसरकारने ‘निडल फ्री’ (सुईशिवाय) लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्याची निवड केली आहे.
नाशिकमध्ये नागरिकांना ‘झायकोव-डी’ ही निडल फ्री लस दिली जाणार आहे.
राज्यात नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्याची या पायलट प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून या दोन जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील निडल फ्री लस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
या लसीमुळे सुई टोचली जाण्याची तसेच रक्त येण्याची भीती राहणार नाही.
दक्षिण आफ्रिकेतील करोना विषाणूच्या ’ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरियंटने प्रशासनाची झोप उडविली असतानाही लसीकरणात नाशिक शहरासह जिल्हाचा टक्का राज्यात निच्चांकी आहे. लसीबाबत नागरिकांमध्ये अद्यापही संभ्रम असल्यामुळे जिल्ह्यात १२ लाख नागरिक पहिल्या डोसपासून तर ३३ लाख नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेल्या पावणेदोन वर्षापासून नाशकात करोनाचे संकट कायम आहे.नाशिकमध्ये आतापर्यंत ४ लाख १२ हजार ६५८ नागरिकांना करोनाची लागण होवून जवळपास आठ हजार ७२९ नागरिकांचा बळी गेला आहे. करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतांनाच,दक्षिण आफ्रिकेतल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटने सर्वांचीच झोप उडाली आहे. करोनाचा अटकाव करण्यासाठी लसीकरण एकमेव उपाय असल्यामुळे केंद्र व राज्यसरकारने लसीकरणावर जोर दिला आहे.नाशिकमध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी ५१ लाख ७५ हजार ८८९ नागरिकांचे उद्दिष्ट लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले होते.परंतु,११ महिने उलटल्यानंतर ३९ लाख ४७ हजार ४४ नागरिकांनी पहिला तर,१८ लाख ४८ हजार ८५२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे पहिला डोस घेणार्यांची टक्केवारी ७६ तर दुसरा डोस घेणार्यांची टक्केवारी ३६ टक्के आहे. त्यामुळे नाशिकचे लसीकरण हे राज्यात सर्वात कमी आहे .त्यामुळे केंद्रसरकारने कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये आता निडल फ्री लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.त्यात नाशिकचाही समावेश असून हैद्राबाद स्थित कॅडीला हेल्थकेअर प्रा.लिमीटेड या कंपनीने भारतातच तयार केलेल्या ‘झायकोव-डी’ ही निडल फ्री लस नाशिककरांना दिली जाणार आहे.
अशी देणार निडल फ्री लस
‘झायकोव-डी’ लसीचे डोस शहरात दिले जाणार आहे. जेट इंजेक्टद्वारे त्वचेतून ही लस दिली जाणार आहे. एका व्यक्तीला २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस दिले जाणार आहेत.त्यामुळे ज्यांना निडलद्वारे लसी घेण्यात भिती वाटते,त्यांच्यासाठी ही लस वरदान ठरणार आहे. कोव्हीडशिल्ड,कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक या तीन लसी पाठोपाठ झायकोव डी ही चवथी लस नाशिकमध्ये उपलब्ध होणार आहे.