धक्कादायक: सप्तशृंगी गडाच्या शितकड्याच्या पायथ्याशी आढळला मालेगावच्या तरुणाचा मृतदेह
नाशिक (प्रतिनिधी): सप्तशृंगी गडाच्या शितकड्याच्या पायथ्याशी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर तरुण हा मालेगावचा असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून मालेगाव येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सप्तशृंगी गडावरील शीतकड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आढळून आला.
याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सप्तश्रृंगीगड शितकड्याच्या खाली असलेल्या भातोडे (ता. दिंडोरी) शिवारातील जंगलात एका युवकाचे प्रेत कुजलेल्याअवस्थेत असल्याची माहिती पोलिस पाटील विजय राऊत यांना समजली. त्यांनी ही माहिती वणी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत अधिक महिती घेतली असता मयत तरुणाचे नाव श्रीरंग राजेश गुप्ता (वय २७, रा. मालेगाव ) असल्याचे समजले.
श्रीरंग गुप्ता हा तरुण मालेगाव येथून १ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला वणीला चाललो असं सांगून घरातून बाहेर पडला होते. तेव्हापासून तो पुन्हा घरी परतला नव्हता. रात्री उशिरापर्यंत श्रीरंग घरी न आल्याने कुटुंबीयांनी गडावर जाऊन अधिक चौकशी केली. यावेळी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता श्रीरंग गडावर येऊन मंदीरात दर्शन घेत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मात्र तो कुठेच मिळून आला नाही. त्यानंतर गुरुवारी (ता. १०) शितकड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात त्याचा मृतदेह मिळून आला आहे.