नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली असून, लोकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे या संकट काळावर सामान्य माणूस मात करत असतांना दुसऱ्या बाजूला फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात आहे. याच जाचाला कंटाळून सातपूर परिसरातील तरुणाने आत्महत्या केली.
फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांमार्फत कर्जदारांना धमकावले जाते. यामुळे या प्रकाराला धास्तावलेला योगेश हनुमंत जाधव (वय,४२ रा. सातपूर कॉलनी) याने शुक्रवारी (दि.२७) रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. योगेश यांचे आनंदछाया परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्री व दुरुस्तीचे दुकान होते. लॉकडाउनमुळे काही महिने दुकान बंद असल्याने योगेश यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. त्यामुळे कंपनीकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावला जात होता. आत्महत्येच्या आदल्या दिवशी गुरुवारी काही लोक वसुलीसाठी योगेशच्या घरी आली होती. अशी माहिती योगेशच्या नातेवाईकांनी दिली, व म्हणूनच योगेशने या त्रासाला कंटाळून गळफास घेत जीवन संपवले अशी तक्रार करण्यात येत आहे. तरी या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे.