धक्कादायक: नाशिकमध्ये पुन्हा 500ची बनावट नोट देऊन फसवणूक!
नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील उपेंद्रनगर येथे भाजी बाजारात दोन दिवसापूर्वीच एका भाजी विक्रेत्यास पाचशे रुपयांच्या खोट्या नोटा देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर ताजा असताना, पुन्हा एकदा असाच प्रकार लेखानगर भाजी बाजारात घडला आहे.
मंगळवारी (ता. ८ ) लेखानगर भाजी बाजार येथे भाजी विक्रेत्या गंगूबाई साळवे या भाजीपाला विकत असताना एका व्यक्तीने चाळीस पन्नास रुपयांचा भाजीपाला घेत पाचशे रुपयाची नोट देऊन उर्वरित पैसे घेऊन निघून गेला.
थोड्या वेळात ही नोट नकली असून, दोन कागदांवर कलर प्रिंट करून चिटकवलेल्या असल्याचे त्यांना निदर्शनास आले व आपली फसवणूक झाली असल्याच समजले.
दोन दिवसांपूर्वीच असा प्रकार उपेंद्रनगर भाजी बाजारात घडला असल्यानंतरही या गंभीर बाबीवर पोलिस प्रशासनाने जणू कानाडोळा केला असल्याचा आरोप काही विक्रेत्यांनी केला आहे. ही घटना घडल्यानंतरच त्या इसमाचा शोध लावला असता तर, त्याच्याकडून सर्व नोटा हस्तगत करता येणे शक्य होते.
सदर संशयित इसमाने अशा एकूण किती नोटा बनवल्या असतील, याचा अंदाज लावता येणं कठीण आहे. शिवाय अशा प्रकारच्या खोट्या नोटा चलनात आणणारी एकच व्यक्ती आहे की मोठी साखळी आहे, याबाबत पोलिस प्रशासनाने गांभीर्याने शोध घ्यायला हवा. गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन सर्रास पैसे लुटले जात आहेत. जेमतेम हातावर घर असणाऱ्या लोकांची ४०० ते ५०० रुपयांची फसवणूक ही मोठी आहे असेच समजले पाहिजे.