देवदर्शनासह पर्यटन केलं, मात्र आंघोळीचा मोह जीवावर बेतला;अंजनेरी तलावात बुडून दोघांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सध्या सुट्ट्या सुरु असल्याने नाशिकजवळील पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. मात्र कोणतीही काळजी न घेता सर्रास पर्यटन केले जात असल्याने अनुचित प्रकार घडत आहेत. अशातच नाशिक मुख्य पर्यटनस्थळ असलेल्या अंजनेरी परिसरात देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या तीन मित्रांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर, अंजनेरी नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे वर्षभर या परिसरात पर्यटकांचा राबता असतो. तर स्थानिक तरुण तरुणी देखील मोठ्या संख्येने त्र्यंबकसह अंजनेरी परिसरात पर्यटनाला येत असतात. त्यामुळे अंजनेरी गडासह पाठीमागील बाजूस असलेल्या प्रति केदारनाथ मंदिरात देखील गर्दी पाहायला मिळत असते.

याच पार्श्वभूमीवर नाशिकहून तिघे मित्र अंजनेरी परीसरात पर्यटनासाठी आले होते. प्रति केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना अंजनेरी गावाजवळ असलेल्या तलावात तिघा मित्रांना आंघोळीचा मोह झाला. यावेळी ते तिघेही पाण्यात उतरले, मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. तर दोघांचा मृत्यू झाला.

रविवारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून नाशिकहून प्रतीक वाकचौरे, प्रसाद झगरे, वैभव वाकचौरे हे तीन मित्र अंजनेरी परिसरातील प्रति केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. परत जात असताना वाटेत अंजनेरी तलाव दिसून आला. त्यामुळे त्यांनी आंघोळ करण्याचे ठरविले. त्यानुसार तिघांनीही पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही गटांगळ्या खाऊ लागल्याने घाबरून त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे स्थानिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेत काठावर असलेल्या प्रतीकला पाण्यातून बाहेर ओढल्यामुळे तो बचावला. तोपर्यंत प्रसाद आणि वैभव हे पाण्यात खूप पुढे वाहून गेल्यामुळे दुर्दैवाने ते बुडाले.

एकाचा मृतदेह मिळाला:
दरम्यान, स्थानिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापनास ही माहिती कळवली. तातडीने त्र्यंबक पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी एकाचा मृतदेह शोध पथकाच्या हाती आला. प्रसाद बाबासाहेब झगरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. हा तरुण छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा होता. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी नाशिक अग्निशमन दलाच्या मुख्यालयासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मदत घेण्यात आली. शिंगाडा तलाव येथून रबरी बोट घेऊन बंबासह जवान त्र्यंबकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अंजनेरी गावातील पोहणाऱ्या युवकांनी सूर फेकून शोधमोहीम सुरू केली होती. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रसाद झगरे याचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. अंधार झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रात्री आठ वाजता दाखल केला. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group