धरणातून विसर्ग सोडल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ !

नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरणातून आज (दि. १३ सप्टेंबर) सकाळी 9 वाजता 2500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्यम मस्वरूपाच्या पावसाच्या हजेरीने धरण पाणलोट क्षेत्रात देखील हजेरी लावली असल्याने नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे गंगापूर धरण हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त भरले. त्यामुळे काल पासून धरणातून टप्प्या टप्प्याने पाण्याचा विसर्ग सूरु आहे. काल सायंकाळी 5 वाजता 1500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, तर आज सकाळी 2500 क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याचे चित्र आहे. पंचवटीतील रामकुंड परिसरातील काही मंदिर थोड्या प्रमाणात पाण्याखाली गेलेली आहेत. तर नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलाय.