नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून मद्यपी पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा गुन्हा समोर आला आहे. वासाळी गावात मंगळवारी (दि.१३ऑक्टोंबर) रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. व याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर माहितीनुसार, वैशाली बाळू खेटरे (वय २८) ही पती बाळू खेटरेसोबत वासाळी येथील मारुती मंदिर परिसरात राहत होती.सोमवारी रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला.या वादात बाळू खेटरेने वैशालीला मारहाण केली. दुसर्या दिवशी सकाळी वैशाली मृतावस्थेत आढळल्याने पोलिस पाटलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.गळा दाबून महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली.सदर प्रकरण दारूच्या व्यसनातून घडल्याचे सांगण्यात येत आहे.संशयित पती बाळू खेटरे यास पोलिसांनी अटक केली असून, सहायक उपनिरीक्षक रघुनाथ नरवटे पुढील तपास करत आहेत.